Sunday, January 28, 2018

देशीवाद आणि उदारीकरण

आता तूरीचं, ज्वारीच, करडीचं, सूर्यफुलाचं कशाच म्हणून खळ राहिलं नाही, काही तर पिकचं राहिली नाहीत, तुरीच्या पाट्यातून फिरताना कायम दिसणारा भगरिचा पाटा, तिळाचा पाटा, करडीचा पाटा,  मधेच माळावर इस्कटलेल्या हुलग्याच्या बिया, सूर्यफुलाचे ताटवे, ज्वारीच्या ताटातून हिंडताना गुपचूप ताटाच्या गर्दीत खाली लपून, मला बघा मला बघा म्हणून, थोड्याशा सुकलेल्या पण पोपटी सुंदर गाजराच्या शेंड्या आणि चालत चालत ते उपटून तसंच मातीसहित खाताना घरी ह्या टायमाला दळत आगर शेंगा फोडत बसलेल्या आज्जीची आठवण.... ...........आता दिसतात ती आधुनिक पिके, ज्वारीच्या जागी मक्याचे ताटवे, सूर्यफुलाच्या जागी सोयाबीन कारण पोट भरायची सोय गव्हाणे करून आपल्या अन्नधान्यातील विविधताच संपून टाकली आहे...उदारीकरणाचा परिणाम....... काही दिवसांनी ज्वारी पण दिसणार नाही आणि जगातील लोक फक्त गहू आणि मका खाताना दिसतील..........हुश्श .... आणि त्यात कसली आलीय सुगी आणि संस्कृती ? ..........................
सुगीची मजा राहिली नाही याचं दु:ख मनात साठवून आणि त्यावर फुंकर मारत मी फुफुट्याने  माखून गेलेली पायवाट तुडवत आमच्या दोन एकराच्या तुकड्याच्या दिशेने  चाललो आहे. आमच्या हजारो पिढ्यांचा वारसा सांगणारा हाच फक्त तो दोन एकराचा तुकडा कसाबसा उदारीकरणाचे तडाखे खात  शिल्लक राहिला आहे . हिच कायती अडगळ ज्याला कुणी हिंदू म्हणेल, कुणी कुणबी म्हणेल, कुणी साप्त्सिंधुचा वारसा म्हणेल किंवा कुणी आमच्या हजारो पिढ्यांच्या शोषनाचा हा इतिहास आहे म्हणून बदड बदड बदडून काढेल. शेकडो राजकीय, सामाजिक, भौगोलिक, आर्थिक क्रांत्याच्या तडाख्यातून सुद्धा तावून सुलाखून शिल्लक राहिलेली आणि इथून पुढे पण तंत्रज्ञानाचे तडाखे पचवून मानवी विनाशा नंतर पण शिल्लक राहील आणि जीवश्रुष्टीच्या विनाशा नंतर दुसरा डाव जेव्हा चालू होईल तेव्हा सुद्धा हा पुरावा तसाच राहील. मातीतून उगवून मेघापर्यंत पोचणाऱ्या प्रेमाचा नाही तर मातीत उगहून अवघ्या श्रुष्टीला पोसण्याचा पुरावा आणि इतिहास. होय हि पृथ्वी श्रमिकांच्या तळहातावर जितकी तरलेली आहे तितकीच शेतकऱ्यांच्या घामावर हिची वोल टिकून राहिलेली आहे.  
त्या दोन एकर उरलेल्या अडगळीच्या दिशेने फुफुट्यातून चालताना रिबॉकचे बूट पाय पोळन्यापासून तर वाचवत आहेत, धुळीने पाय घाण होत नाहीत, म्हणजे ती धूळ पायाला लागत नाही पण अंगावर येतेय, त्या रणरणत्या उनात उष्णते बरोबर डोळ्यात जातेय आणि  म्हणतेय, “खंडेराव, या धुळीचा आता तुला त्रास होऊ लागलाय...सवय नाही ना ...पण उदारीकरनाच्या आणि जगरहाटीच्या प्रवाहात पोहून पोहून जेव्हा थकशील तेव्हा हि धूळच तुला आधार देईल, ह्या धुळीत त्या शेतातल्या तुझ्या लिंबाच्या झाडाखालीच तुला झोप येईल ....अगदी शांत .........त्या अनंता पर्यंत पसरलेल्या पायवाटेवरून चालताना दुरून कुठून तरी येणारा तूर करणाऱ्या मशिनचा खटखट आवाज एक तासाची सुगी तरी बाकी आहे, हे तुला जाणवून देईन आणि काही क्षणासाठी तरी तुला बरे वाटेल आणि तुझी वाट हलकी व्हायला मदत होईल, खरीपातली पिके काढून पडलेल्या शिवारातल्या तुरीच्या खोडक्या तुला आजून पण अडगळीचा वारसा दाखवत असतील, दूर कुठेतरी डोक्याला पटकर  बांधून खोडक्या गोळा करणारी बाई तुला तुझ्या आईची आठवण करून देईन आणि चालताना पायवाटेच्या कडेने असलेल्या गजग्याच्या, हिंगनाच्या, लिंबाच्या, चिंचेच्या, बोराच्या, कामुण्याच्या झाडाझुडपात लपून आवाज करणाऱ्या सुंदर पक्षांचे फोटो काढायचे तू विसरून जाशील...उदारीकरणाने तुझ्यासाठी उघडलेल्या मोठ्या दरवाज्यावर आणि फेस्बुकरूपी भिंतीवर डकवायला आणि प्रसिद्ध व्हायला हे फोटो आणि हा गावगाडा उपयोगी येईल म्हणून बरोबर आणलेल्या DSLR क्यमेर्याचे तुझ्या गळ्यातील अस्तित्व तू विसरलेला असशील..... आणि तू त्या शिवारातील उष्णतेचा, दूर कुठून तरी येणाऱ्या मशिनच्या आवाजाचा, कुठून येतोय माहित होत नसलेल्या पक्षांच्या किलबिलीटाचा, लांब तुठेतरी एखादा गुराखी त्याच्या माजावर आलेल्या गाईच्या मागे पळताना शिव्या देतोय त्या अंदुक कानावर पडणाऱ्या शिव्यांचा आणि त्याबरोबर शहरी उदारीकरणापासून दूर असलेल्या त्या शांततेचा आवाज ऐकत आता रानात पोचून आपली तूर बडवायला चालू करायची हा विचार करत चालत आहेस ........आणि अचानक तुला हलवून कोणतरी भानावर आनतं.
मारुतीच्या पारावर बसून भाषण देणारा पाटलाचा चंद्या आहे तो ......बिबू आप्पा, मिट्या, कोंडीबा तात्या, संभू आप्पा आणि मंडळी गप्पा हाणत बसलेली आहेत.
“आन व्हयरं इकास, कसकाय? कापसाचा भाव वाढल काय?, तूरीचा भाव सोड, पण इकत तरी घेईल काय सरकार? काय वाटतंय तुला.......आणि मी तसाच आजून रानातून बाहेर आलेलो नाही.....
“आता काय सरकारला झ्याट गरज राहिलेली नाही शेतकऱ्यांची, तूर, गहू, कापूस, साखर सगळं परदेशातून आनतंय सरकार” पाटलाचा चंद्या म्हणला
“पोराहो शेतकऱ्यांचं आयुष्य मजी, हिजडयाची कमाई दाढी मिशावर असं झालंय, तरी बर ती हर्वेस्टर आल्याती नाहीतर सगळी कमाई गड्यावरच जायची” बिबू अप्पा म्हणालं आणि मला जाग आली.
खरंच उदारीकरणाच्या दणक्यात, हि समृद्ध अडगळ आणि डोक्यावर घेऊन मिरवणारा तो खंडेराव टिकू शकेल का? कि स्वत:चे रुपांतर तो अर्धखंडेराव मध्ये करून नंतर ह्या विश्वभानाच्या घोंगावत्या समुद्रफेसात त्याच्या  आयुष्याचा सुरम्य सप्तरंगी बुडबुडा निरर्थक ठरून त्याच्या माथ्यावरचे पहाटी पांघरलेले रोषण सूर्य ढळून जातील, आणि त्याच्याच घरातील जगण्याच्या समृद्ध अडगळीची उग्रगंधी नष्ट होऊन त्याठिकाणी धुळीचा कणही नसलेली स्वच्छता असेल? कि स्वच्छ ठेवण्यासाठी सोडा पण अडगळीसाठी पण त्याची म्हणून जागा शिल्लक राहिलेली नसेल ? उदारीकरणाच्या ह्या दणक्यात खंडेरावला त्याच्याच अडगळीतून उपरा करण्याची ताकद आहे काय ?
आणि अचानक मला दचकून जाग येते. माझे आंग गर्भगळीत झालेले आहे, अंगाला दरदरून घाम फुटलेला आहे, भीतीने माझ्या छातीचे ठोके मला ऐकू येत आहेत, त्या आठ बाय आठच्या खोलीत ज्या सतरंजीवर मी झोपलेलो होतो ती घामाने ओली झालेली आहे, आणि मला नेमकी कशाची भीती वाटत होती हे मला आता लक्षात आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतं आहेत. सगळंच हरवून बसलेला खंडेराव........ पण हरलाय कुणापुढे? हजारो वर्षाच्या सप्तसिंधूचा वारसा असलेला खंडेराव आपल्या हातून सगळंच निसटून चालले आहे म्हणून घाबरला आहे काय ?
काहि क्षणात माझ्या छातीची धडधड कमी होते, मी स्वतःला सावरून शेजारीच असलेले सिगारेटचे पाकीट घेतो आणि काडीपेटीने पेटवून तिथेच अंथरूनातून न उठता कश मारू लागतो. खोलीच्या त्या सताड नागड्या भिंतीवर ते एकटेच घड्याळ टुक टुक टुक टुक चा लकडा लावत बसलेले असते. रूम पार्टनरच्या बापाने ते अभ्यासासाठी उपयोगी पडेल म्हणून आडतीहून पट्टी आल्या आल्या घेऊन दिलेले होते. त्या घड्याळाची टिक टिक टिक मला काही काळ लुभावून टाकते आणि मला या जगातून दुसऱ्या जगात काही काळासाठी तरी जाण्यासाठी मदत करते. माझी त्या टुक टुक मध्ये समाधी लागणार तेवढ्यात खोलीचा दरवाजा धाडकण उघडून मंजिरी आत येते आणि फतकल मांडून माझ्या शेजारी सतरंजीवर बसून माझ्या गळ्यात पडून एक पप्पी घेते आणि हातातली सिगारेट घेऊन एक कश मारून तोंडातल्या तोंडात धूर घेऊन बाहेर सोडते.
“सिगारेट पिताना तू खूप छान दिसतोस रे, आणि सिगारेट पिल्या नंतर तुझी पप्पी घ्यायला खूप आवडते” ह्या तिच्या वाक्यावर मी काहिच प्रतिक्रिया देत नाही.
माझे अंग आजून थोडेसे वोले आहे. माझ्या डोक्यात आजून हातातून निसटून चाललेली माझी समृद्ध अडगळ आणि हजारो वर्षाचा वारसा आहे. मी तिच्याकडे बघतो.....काही काळ शांत जातो....तिच्या व्होटावरची सुंदर दिसणारी लाली आज माझ्या अंगावर येऊ लागते, तिच्या केसात आवडीने हात फिरवणारा मी तिच्या केसाच्या स्टाईलकडे बघतो, तिच्या एरवी सुंदर वाटणाऱ्या कोरीव भूवयावर आता मला उगवून येणारे छोटे छोटे केस दिसू लागतात एकूणच तिला बघून मला किळस येऊ लागते. पण मी ते तोंडावर दाखवायच्या पुढे जाऊन भूतकाळात गेलो आहे. तिच्याकडे बघून मला माझ्या गावातील बायका आठवू लागतात, म्हातारी आई, आई, आत्या, मावशा, बहिणी, बहिणीच्या सासवा, शेजारची गांधारी मावशी आणि गावातलं आणि गावगाड्यातलं सारं गणगोत. त्यांच्यातल्या कुणीही भुवया कोरलेल्या नसतात, लाली लावलेली नसते, केस कापून फ्याशन केलेली नसते….. हां मग आठवते कोणे एके काळी गावातल्या जत्रेत नाचायला आनलेली नाईकिन.......... तिने व्होटाला लाली लावलेली आसते, भुवया कापून कोरीव केलेल्या असतात, केस कापून विचित्रपणे मोकळे सोडलेले असतात आणि जत्रेत ती नाचत असते. मी मंजीरी पासून जरासा दूर होतो पण माझ्या मनातील गोष्टीचा त्या बिचारीला गंध पण लागलेला नाहीय. ती मला उठवते..
“चल आज तुझ्या मेस मध्ये जेवायला जाऊ” म्हणून वोढून घेऊन जाते. तिथे सगळीच मला शहरी मुले दिसत आहेत पण मला माहित आहे ते अर्धखंडेराव आहेत, त्यांना माहित नाही नेमकं ते कोण आहेत, शहरी म्हणजे पाश्यात्य संस्कृतीला कवटाळताना दमून गेलेले सगळे खंडेराव. आणि ते तो समृद्ध वारसा अभिमानाने दाखवायच्या ऐवजी जोमाने लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. ह्या दांभिक लोकांचा आता मला राग येऊ लागलेला आहे. पण मंजिरीला माझ्या बरोबर आजचा रविवार मस्त एन्जोय करायचाय........
मेसमधले जेवण येते.
“चपाती, राजमा, भात, आणि रविवार असल्याने पनीर” हे बघून आजून माझ्या कपाळात गोट्या जातात पण आपल्या आतली खदखद नेहमीच बाहेर दिसली पाहिजे असं काही नसतंय हे  स्वतःला समजाऊन खायला चालू करतो. मंजिरी, “अम्म्म्म यम्मी म्हणते .....” मी पण भूक लागल्याने बका बका खातो आणि आम्ही बाहेर कुठेतरी फिरायला जातो. नेहमीप्रमाणे ती माझा हात हातात घेते आणि खट्याळपणे माझ्या तळहातावर मधल्या बोटाने गुदगुल्या करते. पण मी आज वेगळा होतो, मी हात काढून घेतो आणि म्हणतो, “तुला माहित आहे का असं कोण करतं? आमच्या गावाकड जत्रेत नाचायला येणाऱ्या बायका पाचची नोट दिली कि असं करतात....” आणि ती सणकन माझ्या थोबाडीत मारते .....आणि मी दचकून जागा होतो ......
वातानुकुलीत खोलीत माझ्या शेजारी बायको झोपलेली आहे, शेजारी पोरगा शांत निजलेला आहे, मला घाम आलेला नाही पण मी पुन्हा दचकून उठलो आहे.....मी उठून बाहेर येतो आणि रात्री दोन वाजता सिगारेट पेटवून बाल्कनीतून शहर पाहू लागतो. आज शहर वेगळंच दिसत आहे. आपल्या इमारतीसमोर दूर क्षितीजापर्यंत दिसणारी झोपडपट्टी आणि तिच्यावर आपला कोमल प्रकाश वर्षाव करत ऐटित आपल्या आकाशात ढगांना दूर सारत मार्गक्रमण करणारा चंद्र. तो चंद्र आमच्या इमारती मध्ये आणि त्या अथांग पसरलेल्या झोपडपट्टी मध्ये अजिबात फरक करत नाहीये. मी ज्या इमारतीच्या बाल्कनीत उभा राहून ऐटीत सिगारेट पीत आहे ते पण उदारीकरनाचेच अपत्य आहे आणि माझ्या समोर लाखो करोडो जीवांना किड्या मुंग्या सारखं सामावून घेऊन चंद्र प्रकाशात न्हाहून निघालेली झोपडपट्टी पण उदारीकरनाचेच अपत्य आहे. एकंच आई अशी दोन वेगवेगळी अपत्य कशी काय जन्माला घालू शकते ?
आणि पेन घेऊन पहाटे लिहायला बसतो.
भांडवलशाही, साम्यवाद, समाजवाद, देशीवाद, स्वैतान्त्रिक मार्स्कवाद, सप्तसिंधूचा वारसा, जगण्याची समृद्ध अडगळ  ह्या सगळ्या भंपक संकल्पना आहेत. सत्य एकंच आहे. “Basic Instincts”.  पण “2001: A Space Odyssey” मध्ये त्या माकडाच्या हातात एक हाडूक लागलं आणि सगळा घोळ तिथून चालू झाला. आणि आजून आपण ते हाडूक चघळत बसलो आहोत. किंवा आता इथपर्यंत येऊन पोचलो आहोत कि ते हाडूक ना उगलते बन रहा है ना निगलते बन रहा है. सगळा खेळ त्या हाडकाचा आहे बाकी सब माया है. असं जरी म्हटलं तरी आपण त्या हाडका पासून किंवा मानवाने तयार केलेल्या जीवनशैली पासून दूर पळू शकत नाही. फार फार फार दूर आलो आहोत आणि आपल्याला ह्या मानवनिर्मित संकल्पाना पैकी सर्वात सोयीची, सर्वांचे कल्याणकारी आणि पृथ्वीचा विनाश न करणारी संकल्पना स्वीकारायची आहे.
Prostitution is called the first profession of the world, तिथून जरी चालू केलं तरी भांडवलशाही हि नैसर्गिक नियमाच्या सर्वात जवळ जाणारी संकल्पना वाटते. म्हणजे भूक लागल्यावर दिसेल ते खाण्यापासून ते कमवून खाण्या पर्यंतचा मानवाचा प्रवास हा भांडवलशाहीचा द्योतक दिसतो. आणि मग न्याय व्यवस्था बळी तो कान पिळीच्या विरुद्ध सर्वांना समान न्याय वगैरेच्या भूमिकेतून बाकी अनेक संकल्पनांचा जन्म झाला असावा.अर्थात आजचा माझा विषय तो नाहीय. परंतु अश्मयुगा पासून सुरु झालेल्या मानवाच्या इतिहासात आजपर्यंत अनेक स्थित्यंतरे आली आणि वेगवेगळ्या प्रदेशात वेगळ्या साम्ज्व्यवस्था निर्माण झाल्या. साम्यवाद, देशीवाद आणि आजची सार्वजनिक भांडवलशाही किंवा आपण प्रेमाने तिला Crony capitalism म्हणू.
आज उदारीकरणाचा घोषा लावणाऱ्या आणि देशीवाद संपून गेला आहे आणि खंडेरावने आता उदारीकरणाशी मिळतेजुळते घेऊन त्याचा भाग होऊन जगाला, शहरांना  अंगावर घेण्याची ताकद ठेवली पाहिजे म्हनाराना हे माहित नसते किंवा अंदाज सुद्धा आलेला नसतो कि उदारीकरणाचा राक्षस हा फक्त भारता पुरता मर्यादित नाही तर पृथ्वीलाच नेस्तनाबूत करण्याच्या मार्गावर आहे. Crony Capitalism मध्ये विकासाची व्याख्या , Development is a maximum utilization of available resources” अशी होते. पृथ्वीवरील साधन संपत्ती अमाप आहे असे मानले तरी तिचा वापर करून पृथ्वीचा सर्वनाश होण्यासाठी आजून पन्नास वर्ष पुरेशी आहेत आणि नंतर आपल्याला दुसऱ्या ग्रहाचा शोध घ्यावा लागणार आहे. तेवढा पुढचा विचार न करता भारता पुरता जरी विचार करायचं म्हंटलं तरी.....
एकूण तेरा टक्के राष्ट्रीय उत्पन्नावर गुजराण करणाऱ्या आणि शंभर टक्के म्हणजे एकशे वीस कोटी लोकसंख्येला पोसणार्या बहुसंख्य लोकसंख्येला व्यवस्थेने स्वत:च्याच देशात मागतकरी बनवून टाकले आहे. स्वातंत्र्यानंतर जगामध्ये आकाराच्या मानाने सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देशाला, कोणत्या प्रकारची आर्थिक व्यवस्था सर्वांगीण विकासाच्या मार्गावर घेऊन जाण्यास योग्य ठरेल हे ओळखण्यास भारतीय नेतृव कमी पडले. भारतासारख्या शेतीप्रधान, मोसमी पावसावर अवलंबून असलेल्या आणि सरकारच्या कोणत्याही मदतीशिवाय हजारो वर्ष स्वतंत्र गावगाड्यावर आर्थिक स्वातंत्र्य उपभोगणाऱ्या शेतकऱ्यांना आणि शेतीवर आधारित शेतमजुरांना, भांडवलशाही आणि तथाकथित समाजवादी व्यवस्थेने गुलाम करून टाकले आहे. पाउस नाही म्हणून पिक नाही, पाउस पडला तर भाव नाही, भाव असला तर शेतकऱ्यांच्या हातात पिक नाही ह्या दृष्ट चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग शेकडो वर्ष भविष्यकाळात सुद्धा दिसत नाही. आणि अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना परावलंबी होण्यापासून आता कुणीही वाचवू शकत नाही.


साधारण वीस वर्षापूर्वी मला आठवते कि आमचे आजोबा, आज्जी आणि गावातील इतर लोक ज्वारी, तूर, करडई या मुख्य पिकांचे बी` जपून ठेवत आणि त्याला थोड्याफार गावरान पद्धतीने धुवून वगैरे किंवा थोडेसे थायमीट लावून पेरणी करत. पिकांचे अनेक गावरान वाण होते.  प्रत्येक वाणाच्या ज्वारीच्या भाकरीची चव वेगळी लागत असे. तेच डाळींचे पण. जवस, भगर, तीळ, लसून, पपई, घेवडा, मूग, हुलगा, हादगा, शेवगा, काकडी, वाळूक, शेंदाड अशा किती तरी पिकांचे वाण एका छोट्याशा कापडी फडक्यात बांधून घराच्या छताला असणाऱ्या आडाला बांधून ठेवत. आणि पेरण्यांच्या काळात हेच बियाणे म्हणून वापरले जाई. तेव्हा शेतकऱ्यांना आणि सरकारला बियांण्यांसाठी व्यापारी,कंपन्यांवर अवलंबून रहायची वेळ येत नसे. आज गावातले चार आणे शेतकरी सुद्धा स्वतःचे बियाणे वापरत नाहीत. सर्व मूळ बियाणे जी निसर्गाची देणगी होती तेच आता समूळ नाशाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. ही समस्या फक्त भारतापुरतीच मर्यादीत नाही, तर संपूर्ण जगातच हा झगडा सुरू आहे. आणि हे सगळं जगातून भूक साम्पावाण्यासाठी चालू आहे म्हणे.

भूकेची कारणे
देशी किंवा नैसर्गिक वाणांमुळे शेतीउत्पादन पुरेसे वाढत नसल्यामुळे उपासमार होत होती, हे अर्धसत्य आहे. उपासमारीची कारणे वेगळी आणि व्यवस्थेमध्ये दडलेली आहेत. असंतुलित समाजरचना, बाजारशरण अर्थव्यवस्था आणि भांडवलशाहीचा विपर्यास ही भुकेच्या समस्येची कारणे आहेत. आज अमेरिकेतील एक माणूस जेवढे अन्न वाया घालवतो त्यापेक्षा कमी अन्नामध्ये आफ्रिकी आणि आशियायी माणूस जगतो. बाजारकेंद्री व्यवस्था बदलली नाही तर जगाच्या गरजेपेक्षा दीडपट अन्नउत्पादन झाले तरी उपासमार, भूकबळी यांचे अस्तित्व असणारच आहे. भारतात दुसऱ्या हरिक्रांतीचे डोहाळे लागलेल्या सरकारला हे विचारणे गरजेचे आहे कि या क्रांतीची गरज कुणाला आहे? आताच  शेततकरी पिकवत असलेल्या शेतमालाला सरकार भाव देत नाही तर दुसऱ्या हरिक्रांतीमधून निर्माण होणाऱ्या अफाट आणि निकृष्ट शेती उत्पादनाला सरकार भाव देऊ शकणार आहे काय?

भारतासारख्या गरीब देशातल्या लोकांना गुलाम करण्याची ही विकसित पाश्चिमात्य देशांची चाल आहे, असा एक लोकांचा समज असतो. पण हे इतके साधे-सोपे नसते. ह्या कंपन्या भांडवलावर चालतात आणि भांडवलाला जात, भाषा, देश वगैरे काही नसते. असते फक्त एकच लक्ष्य- नफा, अजून नफा आणि अजून जास्त नफा. ह्या भांडवलावर मालकी असलेले मोजके लोक फक्त भारताला नाही तर जगातील देशनिरपेक्ष सगळ्या लोकांना गुलाम बनविण्यात यश मिळवू शकतात.

थोडक्यात प्रदूषण, वाढते तापमान, समुद्राच्या पातळीत वाढ, दुष्काळ, अम्लांचा पाउस ह्या सगळ्या गोष्टींची भीती प्रसारमाध्यमातून दाखवली जाते पण पृथ्वीच्या विनाशाला कारणीभूत हे जीवशास्त्रीय आणि रसायन शास्त्रीय तंत्रज्ञान असणार आहे हे कुणीही सांगत नाही. जगातील सरकारांनी जर बियाणे, शेतीवरील औषधे, मानवाची औषधे यांच्या कारभारावर नियंत्रण आणायचे ठरवले तरी ते आता शक्य नाही. कारण वेळ निघून गेलेली आहे. तेवढी त्यांची ताकदही नाही.






शेतकरी आणि शेतमजुरांची मजुरी, बियाणांचा खर्च, औषधांचा खर्च आणि पिक विकून येणारा फायदा याचे ब्यालांस शीट जर उद्योगाप्रमाणे तयार केले तर वर्षानुवर्ष शेती फक्त तोट्यातच दिसेल. एखाद्या कंपनीला जर वर्षानुवर्ष तोटा होत असेल तर ती कंपनी बंद पडते, चालू शकत नाही, हजारो कामगार बेकार होतात, आणि हजारो संसाराची राखरांगोळी होते ते आपण पाहतच असतो. इथे फक्त सगळ्याच शेतकऱ्यांच्या संसाराची राखरांगोळी झालेली आहे पण ती अजून बाहेरून दिसत नाही कारण अजून पाउस पडत आहे, आणि वाट्याला आलेली एकदोन एकर किंवा तीनचार एकर जमीन शेतकरी दुसरा काहीच पर्याय नसल्याने कसत आहेत. वरतून चालू कारखान्याप्रमाणे कार्यरत दिसत असलेली शेती व्यवस्था आतून पोखरून गेलेली आहे आणि राज्यकर्त्यांनी हा रोग ओळखून त्याचा मुळापासून इलाज केला नाही तर भारत हे राष्ट्र बनाना रिपब्लिक व्हायला उशीर लागणार नाही.

त्यात आजची शेतीव्यवस्थेपासून आणि गावगाड्यापासून दूर झालेली राजकीय मंडळी आणि सगळ्या सरकारी सवलती घेऊन वातानुकुलीत कार्यालयात काम करून वातानुकुलीत बेडरूम मध्ये झोपणारी मंडळी, दरवर्षी नवनिर्मिती करून, स्वतःचे पिक निर्मितीमुल्या पेक्षा कमी भावात विकनार्या शेतकऱ्यांना जेव्हा आमच्या कारदात्यांच्या जीवावर जगणारे फुकटे असे संबोधतात तेव्हा त्यांच्यावर अगदी नजीकच्या भविष्यात येणाऱ्या संकटाची चाहूल त्यांना नसते.

स्वातंत्र्यानंतर सुरुवातीला रशिया सारखेच आपण पण मोठे मोठे उद्योग काढले कि आपण पण रशिया सारखे श्रीमंत होऊ आशा स्वप्नात रंगणारे नेतृत्व आणि नंतर युरोप अमेरिकेसारखी भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारली कि आपण पण अमेरिकेसारखे किंवा कमीत कमी चीनसारखे बलाढ्य राष्ट्र होऊ आशा स्वप्नात वावरणारे कमकुवत आणि पुरातन भारतीय व्यवस्थेची नाडी न वोळखलेले नेतृत्व भारताला लाभले हे भारताचे दुर्दैव आहे.  रशिया जगातील सर्वात मोठे राष्ट्र आहे आणि त्यांच्याकडे असलेली नैसर्गिक साधनंसंपत्ती, लोकसंखेच्या प्रमाणातील त्या देशाचा आकार ह्या गोष्टी पाहता त्यांना त्यांचे विकासाचे मॉडेल योग्य होते. स्वत:च्या देशात काही पिकत नाही म्हणून व्यापारीकरणातून आणि नंतर औद्योगीकरनाच्या माध्यमातून निर्माण झालेली भांडवलशाही बाजाराभिमुक अर्थव्यवस्था ह्या इतर देशांचे शोषण करून किंवा शोषण करण्यासाठीच निर्माण झालेल्या आहेत आणि अजूनहि अमेरिकन आणि  युरोपियन अर्थव्यवस्था ह्या इतर देशांच्या शोषणावरच उभ्या आहेत. हे भारताला आणि इतर आशियायी अर्थव्यवस्थाना समजत नाही. त्यामुळे ज्या व्यवस्थेने पाश्चिमात्य देशांना श्रीमंत आणि विकसित बनवले, विकासाचे तेच मॉडेल भारतासारख्या अतिशय दाट लोकसंख्या आणि सांस्कृतिक, आर्थिक आणि पिकपद्धतीत सुद्धा विविधता असलेल्या देशाला पण योग्य होईल ह्या भ्रमात अजूनही कारभारी मंडळी जनतेला अछ्या दिनाची गाजरे दाखवून सत्ता उपभोगत आहेत. परंतु याचा विस्फोट होण्यासाठी आपल्याला अजून शंभर किंवा दोनशे वर्ष वाट बघण्याची गरज नाही तर आताच दरडोई चार-पाच एकर वर आलेला शेतकरी आणि दरवर्षी लाखोंच्या संख्येने बाहेर पडणारे पदवीधर यांना खाऊ घालायची ताकत ना आपल्या शेतीत उरली आहे ना आपल्या उद्योगामध्ये.

या व्यवस्थेने विकासाची फळे फक्त काही लोकांनाच मिळून बाकी बहुसंख्य लोकांना त्याच्या तोंडाकडे बघून आपल्याला पण कधीतरी असेच अछे दिन येतील म्हणून जगण्यास आणि पिढ्यान पिढ्या अछे दिनाची वाट बघत अखंड गरिबीत दिवस काढण्यास मजबूर केले आहे.

आधुनिक भांडवलशाही युगात ट्रिकल डाऊन थेरीहि अतिशय भयानक संकल्पना काही लोक मांडताना दिसतात, आशा संकल्पना फक्त काही भांडवलशहाना सुरक्षितरीत्या पोसता यावे आणि सामान्य लोकांना कायम आर्थिक गुलामगिरीत ठेवता यावे म्हणून तयार केलेल्या असतात. ट्रिकल डाऊन थेरीम्हणजे, उदारीकरणा मुळे एक मध्यम वर्ग तयार होईल, तो भारतीय आणि परदेशी अशा मोठ्या कंपन्या मध्ये काम करून भरपूर पैसा कमवेन आणि तो पैसा त्यांनी खर्च केल्या नंतर तो खालच्या स्तरातील गरीब लोकापर्यंत पोचून त्यांना पण उदारीकरणाचा फायदा होईल. म्हणजे एखाद्या इंजीनियरणे घर घेतले कि त्याच्या घरी कामवाली बाई लागेल, त्याच्या सोसायटीला सेक्युरिटी गार्ड लागेल, तो आणि त्याची बायको संध्याकाळी हॉटेल मध्ये जेवायला आणि सिनेमाला जातील तिथल्या हॉटेलात जेवण वाढण्यासाठी वेटर लागतील, सिनेमाघराची दरवाजे उघडायला दरबान लागतील आणि आशा प्रकारे रोजगार निर्मिती होऊन शेतीवरील बोजा कमी होईल आणि ते अप्रत्यक्ष रित्या लोकांची श्रीमंती वाढवायला मदत करतील. हे किती फसवे आहे हे इथे विस्तार करून सांगायची गरज वाटत नाही.

उदारीकरच्या पंचवीस वर्षा नंतर सुद्धा किती टक्के जनतेला सरकार रोजगार देऊ शकले आणि शेतीवरचा किती भार कमी होण्यास मदत झाली याची आकडेवाडी काढली तर ती नगण्य आहे. आपल्याला दिसणारी शहरे हे फुगलेल्या बकाल वस्त्या आहेत. उदारीकरणा नंतर खूपच गाजावाजा होत असलेल्या संगणक आणि संगणकाशी निगडीत सेवांच्या माध्यमातून खूप विकास झाल्यासारखा दिसत असला तरी एकूण राष्ट्रीय उत्पन्नात संगणक आणि निगडीत सेवांचा वाटा फक्त आठ टक्क्यांचा आहे आणि तो तो किती टक्के लोकांच्या वाट्याला आला आहे याचा हिशोब काढला तर आपली म्हणजे देशाची पाऊले कोणत्या दिशेने पडत आहेत हे सहज समजून येईल. आणि भारत महासत्ता होत आहे आणि होणार आहे हे हेच काही उदारीकारानाचा फायदा झालेले चार पाच टक्के लोक जोरात प्रचार करताना दिसत आहेत प्रसार माध्यमांमुळे त्यांचा अवाज म्हणजेच देशाचा आवाज आहे हे जनतेच्या सामान्य जनतेच्या मेंदूत ठसवले जात आहे. आणि त्यांना बघून गरीब शेतकरी शेतमजूर, शहरात राहणारा झोपडपट्टी वासीय यांना पण आपलाच विकास होतोय असा भास होत आहे. दुर्दैव हे आहे कि भारतातल्या बहुतेक गरिबांना ते गरीब आहेत हेच अजून माहित नाहि. हे असंच असत असं त्यांच्या मनात बिम्बलेले आहे.

सर्वसमावेशक विकास करण्यासाठी, ग्रामीण भागाला विकासाच्या प्रवाहात सामील करून घेण्यासाठी आणि धोरणामध्ये मुलभूत बदल करण्याची आवश्यकता आहे. आतरराष्ट्रीय उदारीकरणाच्या प्रवाहातून बाहेर न पडता, विकासाचे विकेंद्रीकरण ग्रामीण भागात करणे आणि शेती आणि शेतीवर आधारित अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी शेतीभिमुख अर्थसंकल्प तयार करणे हे सरकाचे उद्दिष्ट असले पाहिजे. शंभर स्मार्ट शहरांची नाटकं करण्यापेक्षा भारतातील ग्रामीण भाग जर आर्थिक दृष्ट्या सबल केला तर शहराकडे होणारे स्थलांतर थांबून शहरे आपोआप स्मार्ट होतील. त्यासाठी गरज आहे पुन्हा गावाकडे चला म्हणण्याची.

ग्रामीण भागात शेती आणि शेतीवर आधारित अर्थव्यवस्था मजबूत केली जाऊ शकते हे सहकाराच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात सिद्ध झालेले आहे. सहकाराला सरकारची मदत आणि मायक्रो फिनान्स द्वारा ग्रामीण भागात लघुउद्गोगांचे जाळे निर्माण करणे, अन्नधान्य प्रोसेसिंग, दुध आणि दुध्जन्य पदार्थ, तेल बिया आणि आणि तेल, साखर उद्योग, फर्निचर ह्या उद्गोयागा मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला अन पर्यायाने शेतकरी आणि अकुशल कामगारांना स्वावलंबी बनवच्याची क्षमता आहे आणि त्यासाठी भारताला बाहेरची बाजारपेठ शोधावी लागणार नाही भारताची बाजारपेठच खूप मोठी आहे. परंतु या गोष्टीवर सरकारचा खर्च बघता आणि मोठ मोठ्या उद्योगांना दिलेलेया सवलती आणि कर्ज बघता सरकारला भारत माजुब्त व्हावा असे वाटत नाही तर काही औद्योगिक घराणीच मजबूत व्हावीत असे वाटत असावे.

आपण भाकरी, आरोग्य, शिक्षणापासून वंचित राहून , फुकट मिळणाऱ्या इंटरनेट डेटा प्याक वर खुश होऊन भारत महास्तता आणि विकसित होत आहे या प्रोपोगंड्यावर खुश होत राहू. जेव्हा जागे होऊ तेव्हा उशीर झालेला असेल.  

उदारीकरणाचा फायदा झालेले दहा टक्के लोक खंडेरावानी  आता जगाशी दोन हात करायला शिकले पाहिजे म्हणून धोशा लावतात, हजारो वर्ष फुकटात आयतखाऊ आयुष्य आणि शेतीव्यवस्थेवर बांडगुळे म्हणून जगलेले लोक समस्त खंडेरावाना जेव्हा स्वत:च्या हिमतीवर जागाशी सामना करायचे आव्हान देतात तेव्हा हजारो वर्ष आयते खाऊन आणि साधन सामुग्रीचा फायदा घेऊन पन्नास वर्ष पुढे गेलेले हे लोक अमेरिकेत किंवा युरोपातल्या कोणत्या तरी राष्ट्रात राहून आपल्याला राष्ट्रवाद शिकवत असतात. आणि दुर्दैवाने गावगाड्यात सन्मान न मिळालेले लोक शहरातील झोपड पट्टीत राहून उदारीकरणाचे समर्थन करतील पण एखादा सुमध्य साधणारा दुसरा मार्ग पण असू शकतो जो शहरातील झोपडपट्ट्यात जात नाही तो शोधायचा सोडून एक गुलामी सोडून दुसऱ्या गुलामीत सुख मानताना दिसतात.

खंडेरावानी शहरे अंगावर घेतली पाहिजेत, खंडेरावानी शहरे अंगावर घेतली पाहिजेत, खंडेरावानी शहरे अंगावर घेतली पाहिजेत, असे सल्ले देताना विचारवंत पहिले कि हसू येते.
शहरे अंगावर घेणे आणि यशस्वी होणे हि लोकांची तत्कालीन गरज आहे. तो काय भारतासमोर ओ करून उभ्या राहिलेल्या गरिबी, शहरीकरण, प्रदूषण, बकालीकरण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मजुरांची पिळवणूक आणि शेवटी जातीयवाद यावरचा उपाय असूच शकत नाही.
आपण म्याक्रो लेवलला जर विचार केला तर ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारल्या शिवाय भारत आणि भारतातील लोकांचा विकास होऊ शकणार नाही. सगळेच ग्रामीण भागातले लोक जर गावगाड्यात स्थान नसलेल्या आणि गावगाड्यात सर्वोच्च स्थान असलेल्या आयतखाऊ जातींसमूहांनी शहरात येऊन आपल्या तथाकथित वोळखी निर्माण केल्या म्हणून गावं सोडून शहरे अंगावर घ्यायला चालू केली तर शहरात रहायला सोडा उभे राहायला जागा मिळणार नाही.
जेंव्हा नेमाडे एक देशीवादी म्हणून विचार करतात तेव्हा फक्त चांगदेव काय म्हणतो हे विचारात न घेता पांडुरंग काय म्हणतो, खंडेराव काय म्हणतो याचा विचार तर करावाच लागेल पण स्वतः नेमाडे देशीवादाविषयी काय बोलतात याचा पण विचार करावा लागेल.
नेमाडे जेव्हा देशीवाद किंवा जुन्या तथाकथित हिंदू संकृतीचे गोडवे गातात तेव्हा त्यांना या संस्कृती मध्ये अगदी जैन- बुद्ध काळापासून ते आजपर्यंतची संस्कृती अभिप्रेत असते. समाजासाठी एक उत्कृष्ट आर्थिक, सामाजिक, राजकीय व्यवस्था देण्यासाठी आपल्याला पाश्च्यात्य भांडवलशाही जिने आता Crony colonialism चे रूप घेतलेले आहे ती परवडणारी नाही तसेच ती १३० कोटी लोकांचे दारिद्र्य नष्ट करण्याची ताकत पण तिच्यात नाही. आपल्या प्रश्नाची उत्तरे आपल्याला आपल्या संस्कृतीत आपल्या परंपराधे सापडतील. जे वाईट आहे ते सोडून जे चांगले आहे ते टिकवून, त्याच्यात काळानुरूप बदल करून, भारताच्या सर्व समजला न्याय देणारी संस्कृती उभे केली जाऊ शकते, हा आशावाद देशीवादा मधे आहे. हा भाबडा आशावाद आहे का? आपण खूप पुढे निघून आलोय का ? उदारीकरणाने आपले मागे फिरायचे दरवाजे बंद केलेत का ? तर माझे उत्तर आहे "नाही".
उदारीकरणाच्या कचाट्यातून मुक्त होण्यासाठी उदारीकरण सोडून न देता आपल्याल हवे तसे वापरून, आपण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करून एक नवा समृद्ध देश, समाज निर्माण करू शकतो. तोच देशीवाद. स्वतःच्या भाषेत लिहिणे, स्वतःच्या भाषेत बोलणे, स्वतच्या भाषेत व्यापार करणे हा देशीवाद उदारीकरनाच्या ह्या जगात सुद्धा अनेक युरोपियन आणि पौर्वात्य देश टिकवून आहेत. (असो तो मुद्दा वेगळाय)
आपल्याला आपल्या प्रश्नाची उत्तरे आपल्याच मातीत सापडतील म्हटले कि लगेचच "मग जातीवादा विषयी आपले काय मत आहे हा एकंच धोशा सुरु होऊन "मुर्दाबाद - मुर्दाबाद" च्या घोषणा देण्या ऐवजी, देशीवाद म्हणजे जातीयवाद नाही हे समजण्याचा प्रयत्न करावा. नाही केला तरी हरकत नाही. किंवा तुम्ही गावे सोडल्या नंतर जातीयवाद नष्ट झाला का ? आणि ज्यांनी अगोदर गावे सोडली त्यांनी प्रगती केली हे गृहीतक जरी मान्य केले तरी आता उशिराने पांडुरंग , चांगदेव , खंडेराव यानी गावे सोडायला चालू केले तर तोच खेड्यातील जातीयवाद शहरात एका वेगळ्या रुपात वावरणार नाही कशावरून?

छोटे लोक स्वतःसाठी, स्वतःच्या जातीसाठी, मातृभाषिक लोकासाठी उत्तरे शोधत असतात, मोठी माणसं पूर्ण समाजासाठी उत्तरे शोधत असतात. ज्यांनी कुणी गावे सोडून शहरे अंगावर घेतली त्यांचे अभिनंदन आहे, त्यांच्या पुढे तोच पर्याय होता पण तोच पर्यार सगळ्या पुढे आणून सोडणे आणि सगळ्यांना आव्हान देणे कि आता तू पण गाव सोड आणि मोठा होऊन दाखव हे प्रश्नाचे तत्कालीन समाधान शाधाण्यासारखे आहे. ह्याने संपूर्ण समाजाला दिशा मिळणार नाही परंतु समाजापुढे आणखी कठीण प्रश्न तेवढे निर्माण करून ठेवील